- अनुदानाची रक्कम देण्यास राज्य सरकारकडून विलंब…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जानेवारी २०२५) :-पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन महापालिकेने भामा आसखेड धरणातून १६७ एमएलडी पाणी पाइपलाइनद्वारे शहरात आणण्याचे काम हाती घेतले. त्यासाठी धरणात जॅकवेलचे काम सुरु केले आहे. सध्या जॅकवेलचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे.
जॅकवेलच्या कामासाठी महापालिकेने राज्य सरकारकडे अनुदानासाठी प्रस्ताव सादर केला होता. राज्य सरकारने ७६ कोटी ३६ लाख रुपये अनुदान देण्यास संमती दिली होती. त्यातील ५० कोटी राज्याकडून महापालिकेला प्राप्त झाले. तर, २६ कोटी मागील एक वर्षांपासून थकीत ठेवले आहेत. अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी पाणी पुरवठा विभागाकडून अनेकवेळा पाठपुरावा करण्यात आला. तरी, राज्य सरकारकडून ही रक्कम देण्यास दिरंगाई केली जात आहे. परिणामी, जॅकवेलचे काम मार्गी लावण्यात समस्या भेडसावत आहेत.
शहरातील काही भागात २४ तास पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी पालिकेने सात वर्षांपूर्वी २०७ कोटींची निविदा काढली. या कामाचे ५१ कोटी ५० लाख एवढे अनुदान राज्य सरकारने थकीत ठेवले आहे. पाणी पुरवठा विभागाकडून गेली पाच वर्षे राज्य सरकारकडे पत्रव्यहार करण्यात येत आहे. परंतु, थकीत अनुदानाची रक्कम अद्याप अदा झाली नाही. योजनेचे काम ९५ टक्के पूर्ण झालेले असताना देखील ही रक्कम वेळेत मिळत नसल्यामुळे प्रशासनाने नाराजी व्यक्त केली आहे.
भामा आसखेड योजनेचे काम सध्या वेगाने मार्गी लावण्यात येत आहे. जॅकवेलचे काम सुध्दा जलद गतीने केले जात आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटी या प्रकल्पाला निधीची अत्यंत आवश्यकता आहे. तसेच, २४ तास पाणी पुरवठा योजनेचे काम ९५ टक्के पूर्ण केले आहे. या योजनेचे अनुदान देखील गेल्या कित्येक वर्षांपासून थकीत आहे. दोन्ही योजनांचे अनुदान मिळवण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला जात आहे. पुढील महिन्यात राज्य सरकारच्या संबंधित विभागात महापालिकेचे प्रतिनिधी पाठवून अनुदानाची रक्कम मिळवली जाईल.
– प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता (१), पिंपरी-चिंचवड महापालिका…













