- पिंपरी वायसीएम रुग्णालयातील प्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२५) :- पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात मृतदेह ताब्यात न देता बिल भरण्याची मृताच्या नातेवाईकांवर सक्ती केली जात आहे. त्यांची सर्रास अडवणूक केली जात आहे. शस्रक्रियांसाठी देखील रुग्णांना वेटिंगवर ठेवले जात आहे. बेजबाबदार अधिकारी-कर्मचारी आणि डॉक्टरांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जन अधिकार संघटनेचे अध्यक्ष मजीद शेख यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रुग्णालयामध्ये गोरगरीब मध्यमवर्गीय रुग्ण उपचार घेतात. अंत्यसंस्कार विधीसाठी मृतदेह ताब्यात न देता त्यांच्या नातेवाईकांची अडवणूक करणे कितपत योग्य आहे? गरीब रुग्ण रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी येतात. त्यांना जाचक अटींचा विळखा घालून तारीख पे तारीख दिली जात आहे.
रुग्णांना अनेक महिने प्रतीक्षा करावी लागते. केवळ तपासण्यांचाच फार्स केला जातो. त्यामुळे हताश रुग्णांवर उपचार कधी होतील? असा सवाल सामान्य गोरगरीब रुग्ण व्यक्त करीत आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे.
















