- ढासळलेल्या माणुसकीचे दर्शन
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०१९) :- दुपारची वेळ, तळपत्या उन्हाची काहिली, प्रसूती वेदनेमध्ये असलेली महिला आकुर्डी रेल्वे स्थानकांमध्ये मदतीच्या अपेक्षेत. प्रसूती झाली तरी, तिला मदतीसाठी कोणिही पुढे सरसावले नाही. अश्या विदारक परीस्थितीमध्ये आकुर्डी स्टेशन मास्तरांनी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या गंगानगर आकुर्डी विभागाचे प्रमुख पोलीस मित्र संतोष चव्हाण यांना तातडीने फोन केला.
चव्हाण यांचे सोबत प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विजय पाटील, अमित डांगे महिला विभागाच्या अर्चना घाळी, दाभोळकर यांनी त्वरित आकुर्डी रेल्वे स्थानकात धाव घेतली. शासनाची १०८ अँबुलन्स सुद्धा वेळेतच स्थानकात पोहचली. सदर प्रसूत महिला आणि बाळाला तातडीने महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात मध्ये दाखल केले गेले. डॉक्टरांनीही नुकतेच जन्मलेले बाळ आणि महिला दोघेही सुस्थितीत असल्याचे सांगितले.
या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” दक्ष समिती कार्यकर्ते आणि स्टेशन मास्तर यांच्या मदतीमुळे त्या महिलेस तातडीने वैदयकीय मदत मिळाली आणि दोघांचेही प्राण वाचले. प्राधिकरण आकुर्डी उच्चभ्रू परिसरातून हजारो प्रवाशी या ठिकाणाहून प्रवास करत असताना बराच वेळ कोणाचीही मदत त्या प्रसूत महिलेला मिळू शकली नाही. हीच खेदाची बाब आहे. सदरच्या महिलेची स्थानकात प्रसूती होऊनसुद्धा तिला मदतीची वाट पाहावी लागली. हे ढासळलेल्या माणुसकीचे दर्शन आहे. संतोष, अमित, अर्चना ह्या दक्ष पोलीस मित्र कार्यकर्त्यांचे उपस्थित नागरिकांनी अभिनंदन केले.”











