न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२५) :- नेपाळसह भारतातील विविध राज्यातून आलेल्या दिडशे कलाकारांनी सांकेतिक भाषेसह तब्बल १६ भाषांमध्ये भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे गायन करून इतिहास घडवला आहे. अशा प्रकारे सांगितिक कार्य़क्रमातून भारतीय संविधानाला महामानवंदना देणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या ऐतिहासिक कार्यक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.
भारतीय संविधानाला यंदा ७५ वर्षे पूर्ण झाले आहेत. या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीबद्दल भारतीय संविधानाला सांगितिक महामानवंदना देण्यासाठी प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या नियंत्रणाखाली ‘आम्ही भारताचे लोक’ (हम भारत के लोग) हा दिडशे कलावंतांचा सहभाग असलेला भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता.
पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळील मैदानात हजारोंच्या उपस्थितीत विभिन्न भाषेतून भारतीय संविधानाला महामानवंदना देण्यात आली. या ऐतिहासिक सोहळ्याची नोंद ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाली आहे. याबाबतची घोषणा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डच्या कार्यकारी अधिकारी प्रिती मेनन यांनी या कार्यक्रमात ऑनलाइन सहभागी होत केली. त्यानंतर कलाकारांसह नागरिकांनी उत्स्फुर्तपणे भारतीय संविधानाच्या जयघोष करीत जल्लोष साजरा केला.
‘मिले सुर मेरा तुम्हारा’ या विविधतेतून एकतेचा संदेश देणाऱ्या बहुभाषिक गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. भारत हमको जान से प्यारा है, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, ये मेरा संविधान, अशा विविध गीतांचे गायन विविध राज्यातील बहुभाषिक कलाकारांनी केले. यानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या गायनाला प्रारंभ करण्यात आला. यामध्ये हिंदी, मराठी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू, पाली, कोकणी, आसामी, कन्नड, पंजाबी, गुजराती, नेपाळी, मल्याळम, भोजपुरी, बंगाली अशा १५ भाषांमध्ये भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे गायन करण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिका दिव्यांग भवनच्या फाऊंडेशनच्या वतीने सांकेतिक भाषेमध्येही संविधानाच्या प्रास्ताविकेचे सादरीकरण करीत भारतीय संविधानाला महामानवंदना दिली. प्रांतिक पोषाख परिधान करून केलेल्या या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
अशा प्रकारे सांकेतिक भाषेसह तब्बल १६ भाषांमध्ये भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे गायन झालेला हा पहिला कार्यक्रम असल्याने त्याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. महापालिकेने राबवलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय संविधानाला अनोखी महामानवंदना देण्यात आली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मितीसाठी केलेला संघर्ष आणि जीवन प्रवास नाट्याविष्काराच्या माध्यमातून उलगडून दाखवण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालिन राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्याकडे भारतीय संविधानाची प्रत सुपूर्द केली, त्या क्षणाचा प्रसंग देखील यावेळी दाखवण्यात आला. संविधानाने दिलेले हक्क, अधिकार, भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आणि यामाध्यमातून उभे राहिलेले सक्षम यशस्वी राष्ट्र याची मांडणी या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे करण्यात आली. या उपक्रमाचे कौतुक सर्वस्तरातून करण्यात येत आहे.
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. प्रजासत्ताक दिनी महापालिकेच्या वतीने सांकेतिक भाषेसह १६ विविध भाषांमध्ये भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे गायन करीत आपल्या संविधानाला विश्वविक्रमी महामानवंदना दिली. या अनोख्या अलौकिक उपक्रमाची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरवासियांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. भारताचे गौरवगान करणाऱ्या या विश्वविक्रमाने शहराच्या वैभवात भर पडली असून पिंपरी चिंचवडचे नाव जागतिक पातळीवर गौरविले जात आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व कलाकारांचे तसेच कार्य़क्रम यशस्वीतेने घडवून आणणाऱ्या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका














