- निगडी प्राधिकरणवासीयांकडून कु. ईश्वरी मोरेश्वर अवसरे हीचा भव्यदिव्य नागरी सत्कार..
ढोल ताशांच्या गजरात जंगी मिरवणूक अनं शुभेच्छांचाही वर्षाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
प्राधिकरण (दि. 06 फेब्रुवारी 2025) :- आयसीसी अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. निगडी प्राधिकरणातील प्रतिभावंत फलंदाज कु. ईश्वरी मोरेश्वर अवसरे हिने त्यात अभूतपूर्व यश प्राप्त केले. तिच्या कामगिरीमुळे भारावलेल्या निगडी प्राधिकरणवासीयांनी आनंदोत्सव साजरा करीत तिचा बुधवारी (दि. ५) रोजी भव्यदिव्य नागरी सत्कार केला.
ईश्वरीने सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू पुरस्कार २०२४ जिंकण्यापासून ते आयसीसी यु १९ महिला टी २० विश्वचषक २०२५ जिंकण्यापर्यंत यशस्वी घौडदौड पुर्ण केली आहे. त्यानिमित्ताने येथील गणेश मंदिर आणि आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन तीची ज्ञानशक्ति मंदिर, से. नं. २६ परमार पार्क सोसायटी ते गणेश तलाव येथे ढोल ताशांच्या गजरात जंगी मिरवणूक काढण्यात आली. लहान थोरांपासुन ते जेष्ठ नागरिक आणि महिलांनी या मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
त्यानंतर झालेल्या नागरी सत्कार सोहळ्यात विधानपरिषद आमदार उमाताई खापरे, अमित गोरखे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (२) विजयकुमार खोराटे, महाराष्ट्र वरिष्ठ महिला क्रिकेट टीमचे प्रमुख प्रशिक्षक आणि माजी रणजीपटू हेमंत किनिकर, दिवेकर क्रिकेट अकादमीचे दिवेकर सर, माजी नगरसेवक अमित गावडे, उत्तम केंदळे, राजू मिसाळ, शैलजाताई मोरे, सुलभाताई उबाळे, शर्मिलाताई बाबर, नंदाताई ताकवणे, निर्मलाताई कुटे, सरिताताई साने, भाजयुमो प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माळी, हभप बाळुबुवा अवसरे महाराज, ईश्वरीचे वडील मोरेश्वर अवसरे, राजेंद्र बाबर, धनंजय काळभोर, राजेंद्र गावडे, पै. शहाजी अवसरे, अविनाश कचोरे, दत्तात्रय पांगरे आणि निगडी प्राधिकरण परिसरातील क्रिकेटप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्य वरिष्ठ महिला टीमचे प्रमुख प्रशिक्षक हेमंत किणीकर यांनी खेळाबरोबरच अभ्यासाचे महत्व विषद केले. तसेच सचिनसोबतचा किस्सा सांगत ते म्हणाले, सचिन तेंडुलकरच्या अकादमीने पुण्यात एक शिबिर आयोजित केले होते. सचिन, केदार जाधव आणि विनोद कांबळी हे देखील उपस्थित होते. फक्त पाच मिनिटे ईश्वरीची बॅट पाहिल्यानंतर, सचिन तिच्याकडे गेला आणि तिला एक मौल्यवान सल्ला दिला: “तुझी बॅटिंग स्टॅन्स अजिबात बदलू नको. जर कोणी तुला पुढे जाऊन ती बदलण्यास सांगितले तर माझे नाव घे आणि सांगा की सचिन सरांनी मला माझी बॅटिंग स्टॅन्स न बदलण्याचा सल्ला दिला आहे.” त्यानंतर ईश्वरीने मागे वळून पहिलेच नाही भारताच्या १९ वर्षांखालील आशिया कप विजयातही ती सहभागी होती. तिला दीर्घकाळ भारताचे प्रतिनिधित्व करता यावे आणि कामगिरीत सातत्यपूर्ण राहण्यासाठी चांगल्या खेळाडूंशी संवाद आणि तिच्या तंदुरुस्तीला प्राधान्य देत आहोत.
आ. उमाताई खापरे म्हणाल्या, केवळ पंधरा वर्षाच्या कारकिर्दीत ईश्वरीने आकाशाला गवसणी घातली आहे. वयाच्या आठव्या वर्षी तिच्या आई-वडिलांनी या मुलीला ग्राउंडवर क्रिकेट खेळण्यास पाठवलं. ही खरोखरच आज कौतुकास्पद बाब ठरत आहे. त्यात ईश्वरीने एक पाऊल पुढे टाकले आहे. एकेकाळी खेळामध्ये पुण्याची मक्तेदारी होती. आज पिंपरी चिंचवड देखील खेळाडूंचे शहर म्हणून उदयास येत आहे. याच आम्हा पिंपरी चिंचवडकरांना भूषण वाटतं. आमच्या तिला सदिच्छा आहेत. महानगरपालिकेसह राज्य सरकारकडून ईश्वरीला सर्वोतोपरी सहकार्य करू. निगडी प्राधिकरणात लवकरच स्पोर्ट्स काम्प्लेक्सचे भूमिपूजन करणार असल्याची ग्वाहीही आ. खापरे यांनी यावेळी बोलताना दिली.
आ. अमित गोरखे म्हणाले, जन्माला येताच ईश्वरीमध्ये ईश्वरी अंश असावा. म्हणून तिने आज एवढ्या मोठ्या यशाला गवसणी घातली आहे. पिंपरी चिंचवडसह समस्त निगडी प्राधिकरणाच्या शिरपेचात आज तिने मानाचा तुरा रोवला आहे. खरं तर, यात तिचे आई-वडील आणि प्रशिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. प्राधिकरणात जितके सांस्कृतिक तेवढेच क्रीडा विषयाचेदेखील आता महत्व वाढू लागले आहे. ईश्वरीच्या आई वडिलांसह प्रशिक्षकांचं देखील करावं तितके कौतुक कमीच आहे. ईश्वरीने आता भारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप्टनशिप मिळविण्यासाठी प्रयत्नशील रहावयास हवे.
विजयकुमार खोराटे म्हणाले, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कमावणे हे मोठे काम आहे. खेळाडु म्हणून अभ्यासात आणि खेळात सातत्य ठेवल पाहिजे. त्यासाठी पालकांनी सजग रहाव. खेळ हा जिवनाचा अविभाज्य घटक आहे. करिअरसोबतच राज्य आणि केंद्रात नोकरी देखील मिळते. पिंपरी चिंचवड शहराची आता क्रिडानगरीकडे वाटचाल सुरु आहे. इथे खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळत आहेत.
ईश्वरीचे वडील मोरेश्वर अवसरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
















