- नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली झाडांची सर्रास कत्तल थांबविण्याची मागणी..
- सयाजी शिंदे आणि सोनम वांगचुक यांचा आंदोलनात सहभाग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ०९ फेब्रुवारी २०२५) :- नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली झाडांची सर्रास कत्तल करण्याचा डाव पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने घातला आहे. हा डाव उधळून लावण्यासाठी जीवित नदी, पुणे रिव्हायवल आणि रविराज काळे युथ फाउंडेशन यांनी पुढाकार घेत बाणेर येथील मुळा नदीपात्रात चिपको आंदोलन केले.
पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही लक्षणीय संख्या उद्याची निसर्ग संवर्धनाची नांदी ठरेल. मुळातच नदी सुधार प्रकल्प उभा करत असताना नदीचा मूळ प्रवाह संपुष्टात येणार आहे. अनेक जलचर प्राणी मृत्युमुखी पडणार आहेत. या गोष्टीचा जाब विचारला असता अधिकाऱ्यांकडे कोणतंही ठोस उत्तर नाही, अस निदर्शनात आले.
या आंदोलनात प्रसिद्ध सिने अभिनेते सयाजी शिंदे आणि पर्यावरणवादी आणि शैक्षणिक सुधारक सोनम वांगचुक यांनी उपस्थिती लावत आंदोलन मोठे करण्यासाठी सहकार्य केले.
सयाजी शिंदे हे माध्यमांसोबत बोलताना झाडांना खऱ्या अर्थाने संरक्षण देण्याची गरज आहे, असे मत मांडले.
रविराज काळे यांनी सयाजी शिंदे यांना संपुर्ण प्रकल्पाची माहिती सांगितली. मुळात हा प्रकल्प ठेकेदारांची घरे भरण्यासाठी उभा केलेला प्रकल्प आहे. मी स्वतः अनेक वेळा प्रकल्प चालू असलेल्या ठिकाणी भेट दिली. तेव्हा राडारोडा आणून नदीपात्रात टाकला जात आहे. नदीचा मूळ प्रवाह संपुष्टात येत आहे. जलचर प्राणी मृत्युमुखी पडत आहेत, अशा धक्कादायक गोष्टी समोर आल्या, म्हणून आम्ही हे आंदोलन उभ करण्याचा निर्णय घेतला. मी शेवटपर्यंत एकही झाडाला धक्का लागून देणार नाही, असे रविराज काळे यांनी सांगितले. या आंदोलनात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील ६० पेक्षा जास्त सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला होता.