न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२५) :-चिंचवडगावातील दळवीनगर येथील लोहमार्ग उड्डाणपुलावर शनिवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या कारने समोरून येणाऱ्या तीन दुचाकींना धडक दिली. या अपघातात सहा जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. विशेष म्हणजे, या दुर्घटनेत एक दुचाकी पुलावरून खाली कोसळली.
चिंचवडवरून खंडोबा माळ चौकाकडे जाणाऱ्या सोमेश्वर श्रीधर काळे यांच्या दुचाकीला भरधाव कारने जोरात धडक दिली. या अपघातात काळे आणि त्यांचे मित्र अक्षय सुरेश बाटे हे गंभीर जखमी झाले. मात्र, अपघात एवढ्यावरच थांबला नाही. धडकेनंतरही चालकाने गाडी न थांबवता पुढे जाऊन काही दुचाकींनाही धडक दिली. यामुळेदुचाकीवरील दोन दांपत्य जखमी झाले.
या अपघाताची तीव्रता इतकी जास्त होती की एका दुचाकीवरीलस्वाराचा तोल सुटून ती थेट उड्डाणपुलावरून खाली कोसळली. सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नाही, मात्र सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. कार चालक समर्थ कुलकर्णी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.











