न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२५) :- संत गवरशेठ महाराज लिंगायत वाणी यांच्या पुण्यतिथीनिमित्त संत गवरशेठ महाराज लिंगायत वाणी समाधी प्रतिष्ठानच्या वतीने सुदुंबरे येथे शिव महापुराण कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
१६ ते २३ फेब्रुवारीदरम्यान आयोजित या सप्ताहामध्ये भजन, कीर्तन, काकडा आरती, हरिपाठ या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासोबतच रोज रात्री विलास महाराज महाजन यांचे संगीतमय शिव महापुराण कथा महोत्सवही पार पडणार आहे.
येत्या शनिवारी (दि . २२) या महोत्सवाची सांगता होईल. यावेळी संत गवरशेठ महाराज यांच्या समाधीवरील शिवपिंडींवर रुद्राभिषेक केला जाईल. रविवारी (दि. २३) किरण महाराज भागवत यांचे काल्याचे कीर्तन होईल व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल, अशी माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली.

















