- तळेगाव -चाकण-शिक्रापूरसह या भागात होणार पाडापाडीची कारवाई..
- वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांचा संयुक्त बैठकीत निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २७ फेब्रुवारी २०२५) :- पुणे शहराभोवती दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत असल्याने नागरिकांसह वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.२७) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात विविध यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेत यात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
या संयुक्त बैठकीत ठरल्याप्रमाणे वाहतूक कोंडी होणाऱ्या विविध भागात पुढील ३० दिवसात राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्गाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस अनधिकृत व अतिक्रमण केलेले दुकाने, गाळे, बांधकामे व इतर काही तात्पुरत्या स्वरूपाच्या बांधकामांवर सर्व विभागांनी संयुक्तपणे कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले. सर्व विभाग संयुक्त कारवाई करणार असून त्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले. संबंधित क्षेत्रातील महामार्ग व राज्यमार्ग रस्त्यालगतचे दुकाने, पत्राशेड, गाळे, टपरी व अनधिकृत बांधकामे स्वत:हून काढून घेण्याचे आवाहन स्थानिकांना करण्यात आले आहे.
या बैठकीस अतिरिक्त पोलीस आयुक्त, पुणे शहर मनोज पाटील, सह आयुक्त दिप्ती सुर्यवंशी-पाटील, अधिक्षक भूमी अभिलेखच्या आशा जाधव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक संजय कदम, पिंपरी चिंचवड मनपाचे शहर अभियंता मकरंद निकम, वाहतुक विभागाचे उपआयुक्त बापू बांगर आदी बैठकीला उपस्थित होते.
खालीलप्रमाणे कारवाईचे नियोजन असून अनुक्रमे महामार्गाचे नाव आणि कारवाईची तारीख…
१. पुणे – सोलापूर रोड (हडपसर ते यवत, व उरूळीकांचन ते शिंदवणे) :- दि. ०३/०३/२०२५ ते १०/०३/२०२५
२. पुणे – नाशिक रोड (राजगुरूनगर) :- दि. ०३/०३/२०२५ ते १०/०३/२०२५
३. चांदणी चौक ते पौड :- दि. ०३/०३/२०२५ ते १०/०३/२०२५
४. पुणे-सातारा रोड (नवले ब्रिज ते सारोळे) :- दि. १०/०३/२०२५ ते २०/०३/२०२५
५. सुस रोड :- दि. १०/०३/२०२५ ते २०/०३/२०२५ ६. हडपसर (शेवाळवाडी) ते दिवे घाट :- दि. १०/०३/२०२५ ते २०/०३/२०२५
७. नवलाख उंब्रे ते चाकण :- दि. १०/०३/२०२५ ते २०/०३/२०२५
८. हिंजवडी परिसर – माण :- दि. १०/०३/२०२५ ते २०/०३/२०२५
९. तळेगाव – चाकण – शिक्रापूर :- दि. १०/०३/२०२५ ते २०/०३/२०२५










