न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ मार्च २०२५) :- दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेले पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक जऱ्हाड हे जखमी झाले आहेत. दरोडेखोरांनी पोलिसांवर कोयत्याने हल्ला केला. पोलीस उपायुक्त यांनी स्वसंरक्षणासाठी दरोडेखोरांवर गोळीबार केला. यात दरोडेखोराच्या पायाला गोळी लागली आहे, अशी माहिती गुन्हे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिली आहे. दरोडेखोर आणि पोलीस यांच्यात झटापट झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार घरफोडीच्या घटना घडत आहेत. गेल्या आठवड्यात बहुळ गावात दरोडा टाकण्यात आला होता. मध्यरात्री चिंचोशी गावात दरोडेखोर दरोडा टाकणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांना मिळाली होती. पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि चाकण पोलीस ठाण्याचे पथक अशी दोन पथक दरोडेखोरांना पकडण्यासाठी सापळा रचून केंदूर घाटात थांबले होते.
दरोडेखोर येताच त्यांना पकडण्यासाठी पोलीस पुढे आले. दरोडेखोर आणि पोलीस समोरासमोर आले. त्यांच्या झटापट झाली. स्वसंरक्षणासाठी पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी दरोडेखोराच्या पायावर दोन गोळ्या झाडल्या, पैकी एक लागली. यात दरोडेखोर जखमी झाला असून त्याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसऱ्या दरोडेखोराला चाकण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
परश्या गौतम काळे यास श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर येथून ताब्यात घेतले होते. चौकशीअंती सचिन चंदर भोसले, भिमेश ऊर्फ भिमा आदेश काळे, मिथुन चंदर भोसले, ठाग्या चंदर भोसले, अक्षय ऊर्फ किशोर हस्तलाल काळे, राजेश अशोक काळे अशी अटक आरोपींची नावे आहेत.
















