न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ मार्च २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापनेस येत्या २०३२ मध्ये पन्नास वर्षे पुर्ण होत आहेत. आजपर्यंतच्या प्रवासात पिंपरी चिंचवड शहराने बेस्ट सिटी ते स्मार्ट सिटी असा विकासाचा गतीमान टप्पा गाठला आहे. सुवर्णपुर्ती वर्षामध्ये या शहराला डिजीटल शहर करून नागरी सहकार्यातून जागतिक दर्जाचे आधुनिक शहर बनविण्यासाठी व्हिजन@५० चा संकल्प दिशादर्शक आणि फायदेशीर ठरेल, असा विश्वास आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केला.
ताम्हिनी जवळील गरूड माची येथे महापालिकेच्या विविध विभागांच्या प्रमुखांचा सहभाग असलेली दोन दिवसीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत
व्हिजन@५० उपक्रमाबद्दल चर्चात्मक मंथन करण्यात आले. या कार्यशाळेस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन, मुख्य लेखा परिक्षक प्रमोद भोसले, नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्यासह विविध विभागांचे सहशहर अभियंता, उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी शहर परिवर्तन कार्यालयासाठी नियुक्त पॅलेडियम संस्थेच्या तज्ञ मार्गदर्शकांनी गेल्या दोन महिन्यांपासून व्हिजन@५० उपक्रमाअंतर्गत विविध भागधारकांसोबत केलेल्या गटचर्चांमधून आलेल्या प्राथमिक निरीक्षणांवर सविस्तर करण्यात आली.
व्हिजन@५० शहरी धोरण उपक्रमाअंतर्गत शहरी गतिशीलता, पर्यावरण आणि राहणीमान, शिक्षण आणि नागरी कल्याण, तंत्रज्ञान आणि प्रशासन, शहरी पायाभूत सुविधा, आर्थिक विकास या प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या सर्व विषयांना केंद्रस्थानी ठेऊन महानगरपालिकेने आराखडा तयार केला आहे. येत्या ७ वर्षात महापालिका सेवांमध्ये सुधारणा करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुधारणा
करण्यासाठी दीर्घकालीन धोरण विकसित करणे, पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगिण विकास करणे, शहरातील प्रत्येक नागरिकाला शहराची ओळख निर्माण करणेकामी विकास धोरणात समाविष्ट करणे, चिरस्थायी पर्यावरणपुरक शहर आणि शहराची वेगळी ओळख निर्माण करणे व शहर विकासासाठी आवश्यक परिणामांची वेगवान अंमलबजावणी करणे आणि महानगरपालिकेचे कामकाज आणखी पारदर्शक होणेकामी शहरातील नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर देणे आदी गोष्टींचा समावेश आहे.
















