न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ मार्च २०२५) :- महापालिकेच्या वतीने शहरात पंतप्रधान आवास योजनेंर्तगत गृहप्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पाच्या शहरस्तरीय तांत्रिक कक्षाचे (सीएलटीसी) कामकाज करण्यासाठी क्रिसील लिमिटेड या एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे.
कामाची मुदत दोन वर्षांची असताना त्या एजन्सीला १७ महिने मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतरही या गृहप्रकल्पाचे काम न संपल्याने त्या एजन्सीला थेट पाच वर्षांसाठी दुसरी मुदतवाढ देण्यात आली आहे.
पंतप्रधान आवास योजनेत महापालिकेकडून चर्होली, बोऱ्हाडेवाडी, आकुर्डी, पिंपरी, डुडुळगाव तसेच, रावेत येथे गृहप्रकल्प राबविण्यात येत आहे. त्या संदर्भातील शहरस्तरीय तांत्रिक कक्षाचे काम करण्यासाठी क्रिसील लिमिटेड या एजन्सीची १० ऑक्टोबर २०२३ पर्यंत नेमणूक करण्यात आली होती. महापालिका आता पंतप्रधान आवास योजनेत २.० मध्ये गृहप्रकल्प उभारणार आहे. त्या प्रकल्पातील काम करण्यासाठी स्थापत्य पीएमआय प्रकल्प विभागाने निविदा न काढता त्याच एजन्सीची थेट पाच वर्षांसाठी नेमणूक करून १० मार्च २०३० पर्यंत दुसरी मुदतवाढ दिली आहे.
















