न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ मार्च २०२५) :- येत्या ७ मार्चपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे दीड हजार आणि मार्च महिन्याचे दीड हजार असे एकूण तीन हजार रुपये जमा होणार आहेत. सरकारकडून या महिन्यात लाभार्थी महिलांना डबल गिफ्ट मिळणार आहे.
याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स पोस्ट करत माहिती दिली आहे. ‘लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट ! महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे. ७ मार्च २०२५ पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी ३००० रुपये जमा करण्यात येईल’ अशी पोस्ट आदिती तटकरे यांनी केली आहे.
ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. गेल्या जुलै महिन्यापासून ही योजना सुरू झाली आहे. आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे एकूण सात हफ्ते जमा झाले आहेत. मात्र फेब्रुवारी उलटून गेला तरी देखील अद्याप आठवा हाफ्ता लाभार्थी महिलांना मिळालेला नाही.


















