- लोकशाही दिनासाठी असा करा अर्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ एप्रिल २०२५) :- महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने आज पार पडलेल्या लोकशाही दिन उपक्रमात अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्याबाबत विविध सूचनाही केल्या.
यावेळी सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, कार्यकारी अभियंता किरण अंदुरे, दयमंती पवार,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,नागरी सुविधा केंद्राच्या प्रशासन अधिकारी श्रद्धा बोरडे, कनिष्ठ अभियंता रुपेश बुराणे, संजय लोखंडे, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
आज झालेल्या लोकशाही दिन उपक्रमात एकूण ४ तक्रारवजा सूचना प्राप्त झाल्या. त्यामध्ये एच ए कंपनी यांच्या हद्दीतील निवासी भागातील मोठ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करून देणे,अरूंद रस्ते रुंद करण्यात यावेत, काळेवाडी येथील तापकीर मळा चौक, सर्वे नं.९६/१ आणि ९६/२ मधून दक्षिणोत्तर ९ मीटर रस्त्याचे रखडलेले भूसंपादन, शहरात रस्ता परिसरात सुविधा उपलब्ध कराव्यात आदी सूचनांचा समावेश होता.
लोकशाही दिनासाठी असा करा अर्ज…
लोकशाही दिनासाठी अर्ज दाखल करण्यासाठी लागणाऱ्या विहित नमुन्यातील अर्ज नागरिकांना महापालिकेच्या वतीने सहज उपलब्ध करून देण्यात येत आहे. विहित नमुन्यातील अर्ज करतांना तक्रारवजा निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे. विहीत नमुन्यातील अर्ज अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, यांच्या नावाने १५ दिवसांच्या अगोदर दोन प्रतीत नागरी सुविधा केंद्रांचे विभागप्रमुख तथा समन्वय अधिकाऱ्यांकडे पाठवणे आवश्यक राहील. लोकशाही दिनाच्या दिवशी प्रत्यक्ष तक्रार अर्ज स्वीकारले जाणार नाही.












