- महापालिकेच्या पाईपलाईनच्या कामामुळे चौकाचा गुदमरलायं श्वास…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ एप्रिल २०२५) :- गेल्या अनेक दिवसांपासून महापालिकेने मोशीतील भारत माता चौकातील देहू-आळंदी रस्त्यावर जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू केले आहे. पुणे नाशिक महामार्ग खोदता येणे शक्य नाही. म्हणून त्याच्या खालून जलवाहिन्या नेण्यासाठी येथे खोदकाम करण्यात आले आहे. परंतु, हे काम रेंगाळले आहे. काम पूर्णत्वास न गेल्याने चौकात वाहतुकीची रोज तब्बल दोन-दोन तास कोंडी होत आहे.
दरम्यान पुणे, नाशिक, देहू, आळंदी या चारही रस्त्यांवर वाहनांच्या सुमारे एक किलोमीटरपर्यंत रांगांच्या रांगा लागत आहेत. त्यातच वाहतूक पोलिस परिस्थिती नियंत्रणात आणताना दिसत नाहीत. या चौकालगतच्या चारही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती आहे.
त्याचप्रमाणे भोसरी, चाकण, तळवडे, मरकळ आदी औद्योगिक क्षेत्राकडे जाण्यासाठी याच चौकामधून जवळचा मार्ग जातो. त्यामुळे, या चौकातून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड आहे. वाहतूक कोंडीवर वाहतूक पोलिस आणि महापालिका प्रशासनाने उपाययोजना करण्याची अत्यंत गरज आहे.












