न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२५) :- दुचाकी व मोटारी यांची वाहन परवाना चाचणी मोशी येथील ट्रफिक पार्क येथे पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी न्यू पिंपरी चिंचवड मोटार ड्राईव्हिंग असोसिएशनने केली आहे. सध्या कासारवाडी येथील आयडीटीआर या ठिकाणी ही चाचणी होते. मात्र, या ठिकाणी चाचणीला होणारा विलंब, पैशाची जादा आकारणी आणि आरटीओपासून लांब असलेले अंतर या कारणांमुळे पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी म्हणजेच मोशी ट्रफिक पार्क या ठिकाणी चाचणी केंद्र हलविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयातून दिवसाकाठी जवळपास तीनशे ते साडेतीनशे चाचणी होतात. या कार्यालयाच्या जवळच असलेल्या महालक्ष्मी ट्रॅफिक पार्क येथून साधारण वर्षापूर्वी कासारवाडी येथील आयडीटीआर या ठिकाणी वाहन परवाना चाचणी घेण्याचे ठरविले होते. मात्र, या बदलला विविध ड्राईव्हिंग स्कूल चालक आणि असोसिएशनने विरोध केला होता. तत्कालीन उप प्रादेशिक अधिकारी यांनी त्याबाबतचे परिपत्रक काढल्यानंतर कासारवाडी येथे चाचणी घेण्यास सुरुवात झाली. सध्या पुन्हा ही तपासणी प्रक्रिया मोशी या ठिकाणी हलविण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली आहे. दरम्यान,
आयडीटीआरमध्ये वेळ लागत असल्याने चाचणी वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी आहेत. तसेच, सध्या परवाना काढण्यासाठी आलेल्या वाहनचालकांकाडून फी आकारली जात असून, त्यात आणखी वाढ करण्यात यणार आहे. प्रत्यक्षात आरटीओला त्याचे शुल्क भरूनही पुन्हा वेगळे पैसे देण्याची गरज नाही. वाहन परवाना चाचणी तपासणी पूर्वीप्रमाणे मोशीत व्हावी, अशी आमची मागणी आहे. याबाबत आरटीओ कार्यालयात मागणी करण्यात आली आहे. त्यावर लवकारत लवकर निर्णय घ्यावा. शासनाकडे पैसे भरुनही पुन्हा या चाचणीसाठी जादा पैसे भरण्याची गरज नाही, असे न्यू पिंपरी चिंचवड मोटार ड्राईव्हिंग असोसिएशनचे अध्यक्ष बबन मिसाळ यांनी सांगितले.
याबाबत कोणतेही पत्र अद्याप आलेले नाही. आयडीटीआरमध्ये चाचणी व्यवस्थितपणे सुरू आहे. कोणत्याही तक्रारी नाहीत.
– राहुल जाधव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी…













