न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२५) :- वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर दंडाची पावती भरून पुन्हा नियम धाब्यावर बसवणाऱ्या वाहनचालकांवर आता वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडून थेट परवाने निलंबित करण्याची कारवाई केली जात आहे. जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ४३ वाहनचालकांचे परवाने निलंबित झाले.
मद्यप्राशन करून वाहन चालविणे, मोबाइलवर बोलत वाहन चालविणे, वेग मर्यादेचे उल्लंघन करणे, भरधाव वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाइलचा वापर करणे, विना हेल्मेट दुचाकी चालविणे, सिग्नल जम्प करणे, ओव्हरलोड किंवा क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करण्याचे प्रकार वाहनचालकांकडून सुरू असतात. यातून अपघातांचा धोका वाढतो. त्यामुळे पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहनचालकांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तीन महिने, सहा महिने आणि एक वर्षासाठी लायसन्स निलंबित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. मात्र, सातत्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कायमस्वरूपी परवाने रद्द करण्यात येऊ शकतो.
वाहतूक शिस्त आणि सुरक्षित प्रवासासाठी वाहनधारकांनी व चालकांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसह परवाना निलंबित करण्याची कारवाई केली जाते.
– राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड…












