- ‘आयटीयन्स’ने उघडलीय ऑनलाईन सह्यांची मोहीम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. २४ जून २०२५) :- हिंजवडी आयटी पार्कमधील कर्मचारी व रहिवाशांनी आता एकत्र येत आपल्या हक्कांसाठी आवाज उठवला आहे. हिंजवडी परिसरातील गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करावा, यासाठी वेबसाइटवर ऑनलाईन याचिका सुरू करण्यात आली आहे. त्यास आयटी कर्मचाऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
नागरी सेवा सुधाराव्यात आणि नागरिकांचे जीवनमान उंचावावे, याकरिता राज्य सरकारने तत्काळ निर्णय घेऊन हिंजवडी परिसरातील गावे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करावीत अशी प्रमुख मागणी आहे. सुमारे सात हजार स्वाक्षऱ्या पूर्ण झाल्यानंतर ही याचिका थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती या उपक्रमात पुढाकार घेणारे सचिन लोंढे यांनी दिली. त्याचबरोबर, पुढील टप्यात नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह कोर्टात ऑफलाईन याचिका दाखल करून कायदेशीर लढा उभारण्याचाही मानस व्यक्त करण्यात आला आहे.
या अभियानामागे हिंजवडी आयटी पार्कमधील अनेक नागरिक, आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी एकवटले असून, सर्वसामान्यांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. स्वाक्षरी करण्यासाठी www.change.org/UNCLOG Hinjawadi IT Park ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली असून अधिक माहितीसाठी द हँडल: @pcmchsgsociety याच्याशी संपर्क साधावा. आपली एक स्वाक्षरी मोठा बदल घडवू शकते, असा विश्वास या अभियानाच्या आयोजकांनी व्यक्त केला आहे.
















