न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. 04 जुलै 2025) :- भाजप आमदार प्रसाद लाड यांचे बनावट लेटरहेड व सही वापरून ३ कोटी २० लाखांचा निधी बीड जिल्ह्यात वर्ग करण्यात आला.
अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. मात्र, आमदारांचा निधी योग्य ठिकाणी, योग्य कामासाठी त्या आमदारांच्या परवानगीने वर्ग केला जात आहे का? हे तपासण्याची यंत्रणा शासनाने उभी करावी, अशी मागणी आ. लाड यांनी बुधवारी विधानपरिषदेत माहितीच्या मुद्द्याद्वारे केली.
यापूर्वीही श्रीकांत भारतीय, उमा खापरे, निरंजन डावखरे तर सभापती होण्यापूर्वी प्रा. राम शिंदे यांनाही असाच अनुभव आल्याचे आ. लाड यांनी सांगितले.
विधानपरिषदेतील आमदारांचा निधी राज्याच्या कोणत्याही भागात वापरता येऊ शकतो. हीच संधी साधून ही अफरातफर करण्यात आली, असे लाड यांनी सभागृहात सांगितले. रत्नागिरीच्या नवीन डीओपींना याची शंका आल्याने त्यांनी मंगळवारी फोन करून बीड जिल्ह्यासाठी काही निधी दिला आहे का? अशी विचारणा केली. मात्र, असा निधी दिला नसल्याने संबंधितांकडून त्याची माहिती मागविली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आल्याचे आ. लाड यांनी सांगितले. सभापती शिंदे यांनी यावर हा गंभीर प्रकार असून, याप्रकरणी शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन तत्काळ कारवाई करावी, असे निर्देश दिले.