- राज ठाकरेंचा नेते, पदाधिकारी यांना स्पष्ट आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. ०९ जुलै २०२५) :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना महत्वाचा आदेश दिला आहे. मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर, तसेच मीरा भाईंदर येथील आजच्या मोर्चानंतर राज ठाकरे यांनी आपल्या नेत्यांना महत्त्वाचा आदेश दिला आहे. आपल्या परवानगीशिवाय माध्यमांना प्रतिक्रिया द्यायची नाही, असा आदेश राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
राज ठाकरेंनी याबाबत ट्वीट करत म्हटले की, एक स्पष्ट आदेश… पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही.
पुढे बोलताना राज ठाकरेंनी, माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही असा आदेश दिला आहे.
राज्यात मराठीच्या मुद्द्यावरुन वातावरण तापताना दिसत आहे. मीरा भाईंदर येथे मनसेकडून मोर्चा काढण्यात आला. या घडामोडींवरुन मराठी आणि अमराठी असा वाद तापताना दिसतोय. भाजपच्या काही नेतेमंडळींकडून मनसेला इशारा दिला जातोय. तर मनसेकडूनही त्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे. मनसे कार्यकर्त्यांनी मीरा रोड येथील एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या सगळ्या घडामोडी घडत आहेत. या सर्व घडामोडींवरुन वातावरण तापलेलं आहे. त्यामुळे अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना महत्त्वाचा आदेश दिला. राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत X (एक्स) अकाउंटवर याबाबत आदेश दिला आहे.
















