- न्यायालयानेच महापालिकेला धाडली नोटीस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ जुलै २०२५) :- चिखली, कुदळवाडीतील अनधिकृत प्रार्थनास्थळांना पिंपरी-चिंचवड महापालिकेने बांधकाम पाडण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. या प्रकरणी दाखल याचिकेनंतर आकुर्डी येथील न्यायालयाने महापालिका प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस दिली आहे. तसेच, संबधितांकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
अॅड. असीम सरोदे, अॅड. श्रीया आवले, अॅड. रोहित टिळेकर, अॅड. अरहंत धोत्रे यांनी एकूण १६ प्रार्थनास्थळांबाबत आक्षेप अर्ज आकुर्डीच्या न्यायालयात दाखल केला होता. कोणत्या जमिनीवर कोणत्या भागात अतिक्रमण आहे. जे बांधकाम आहे ते अनियमित, अनधिकृत की बेकायदेशीर आहे. याबाबत स्पष्ट उल्लेख नोटीसमध्ये नाही. महाराष्ट्र नगर रचना कायद्याच्या कलम ३५ नुसार अशा चुकीच्या पद्धतीने नोटीस देणे
बेकायदेशीर आहे. कायद्याची प्रक्रिया न करता व अतिक्रमण हटविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचना प्रशासनाने पाळलेल्या नाहीत.
चिखली, कुदळवाडी येथील संबंधित नागरिकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आलेली नाही, असे मुद्दे याचिकेत मांडण्यात आले होते. याचिकेतील आक्षेपानंतर आकुर्डी न्यायालयाने पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस दिली आहे. तसेच, संबधितांनी ३१ जुलैपर्यंत उत्तर दाखल करावे, असे आकुर्डी येथील न्यायालयाने आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.












