न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २२ जुलै २०२५) :- भोसरी परिसरात एका हॉटेल आचारीकडे हफ्ता मागितल्यावरून झालेल्या वादातून आरोपीने दगडाने डोक्यात वार करून आचारी याला गंभीर दुखापत केली. ही घटना २१ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.४० वाजता हॉटेल न्यू गारवा, भोसरी येथे घडली.
फिर्यादी साहील महमद खान (वय २६, रा. बो-हाडेवाडी, मोशी) हे हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करत असताना आरोपी रोहन अनिल विश्वकर्मा (वय २१, रा. खंडेवस्ती, भोसरी) याने त्यांच्याकडे दरमहा एक हजार रुपये हफ्ता मागितला. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने हातातील दगडाने त्यांच्या डोक्यावर आणि दोन्ही कानाजवळ मारहाण केली. शिवाय, “पैसे दिले नाहीस तर तुला जिवे ठार मारीन,” अशी धमकी देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी आरोपीस अटक केली असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तळेकर करीत आहेत.












