- पाच जणांविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. २२ जुलै २०२५) :- ‘घरबसल्या व्यवसाय करा आणि महिना रक्कम कमवा’ या आमिषाने एकूण १८ लाख ६ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप फरार असून, यामध्ये तीन पुरुष आणि दोन महिला आरोपींचा समावेश आहे.
मे २०२४ पासून ते आजपर्यंत ही घटना वाकडमधील शंकर कलाटेनगर येथील एका इमारतीतील ‘वर्ल्ड वाईड अॅग्रो बिझ प्रा. लि.’ या कार्यालयात घडली. आरोपी क्रमांक १ सुशांत सुभाष पाटील आणि आरोपी क्रमांक २ महिला साथीदाराने यूट्यूब व प्रसिद्धी पत्रकांद्वारे लोकांना आकर्षित केले. आरोपी क्रमांक ३ अभय देवा (व्यवस्थापक), ४ मनदीपसिंग (मार्केटिंग मॅनेजर) आणि ५ महिला (बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर) यांनी फिर्यादीस विश्वासात घेऊन मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत पैसे घेतले.
फिर्यादीसह इतर गुंतवणूकदारांकडून मिळून १८,०६,०००/- रुपये उकळण्यात आले. मात्र आश्वासने न पाळता सर्व आरोपी फरार झाले. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्याचे सपोनि चव्हाण तपास करीत आहेत.












