न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत मोशी येथील प्रभाग क्रमांक ३ मधील गट क्रमांक २५०, ऑस्ट्रिया इमारत जवळ, देहू-आळंदी रस्त्यावर सुमारे १८०५१ चौरस फूट क्षेत्रफळावर उभारलेल्या १६ अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई करण्यात आली. या कारवाईत अनधिकृत पत्राशेडसह व्यावसायिक बांधकामांचा समावेश होता.
अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण रोखण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभाग व ‘इ’ क्षेत्रीय धडक कारवाई पथकाने ही कारवाई केली. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम व क्षेत्रीय अधिकारी तानाजी नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यकारी अभियंता सूर्यकांत मोहिते, उपअभियंता राजेश जगताप यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
कारवाईमध्ये ३ जेसीबी, अग्निशमन व रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या. २३ जवानांसह पोलीस निरीक्षक, वीज वितरण कंपनीचे अधिकारी, अभियंते, अतिक्रमण निरीक्षक, मजूर व कंत्राटी कर्मचारी मिळून एकूण ५० हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते.












