न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्राधिकरण, निगडी येथे १३३ कोटी रुपये खर्चून ‘हरित सेतू’ प्रकल्प राबवला जात आहे. हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर असून, त्यासाठी ग्रीन बॉण्डद्वारे २०० कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला आहे.
या प्रकल्पात रस्ते काँक्रीटीकरण, पदपथ आणि सायकल ट्रॅक रुंदीकरण, तसेच रस्त्यांचे अर्बन डिझाईनद्वारे सुशोभीकरण करण्यात येत आहे.
या प्रकल्पासाठी प्रसन्न देसाई आर्किटेक्ट्स या संस्थेची ५ सप्टेंबर २०२२ रोजी १५ महिन्यांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी सर्वेक्षण, डिझाईन गाईडलाईन्स, अंदाजपत्रक, निविदा प्रक्रिया आणि मास्टर प्लॅन तयार करण्याची जबाबदारी घेतली आहे.
आता प्रकल्पाची व्याप्ती वाढल्यामुळे आयुक्त शेखर सिंह यांनी त्यांची सेवा ऑक्टोबर २०२६ पर्यंत तीन वर्षांसाठी वाढवली आहे. त्यासाठी १ कोटी ६७ लाख ४५ हजार रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या खर्चास स्थायी समितीची मंजुरीही मिळाली आहे.
प्राधिकरण, निगडी येथे सुरू असलेला हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर तो शहरातील इतर आठ क्षेत्रीय कार्यालयांतील १२ प्रभागांमध्येही राबवण्यात येणार आहे. यासाठीही ग्रीन बॉण्डद्वारे निधी उभारला जाणार आहे.














