न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, दि. 23 ऑगस्ट 2025) :- निगडी येथील पीएमपी आगारात ई-बस चालकांनी पगारवाढीच्या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी अचानक कामबंद आंदोलन केले. पहाटे पाच वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत झालेल्या या संपात तब्बल ६० चालक सहभागी झाले. त्यामुळे सुमारे ६० बस रस्त्यावरून थांबल्या आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.
ई-बससेवा चालविण्याचे काम पाहणाऱ्या ट्रॅव्हल लाइन मोबिलिटी सर्व्हिसेस या ठेकेदाराकडे एकूण ९० बस व १५० चालक आहेत. दैनंदिन पगार ६५० रुपयांवरून १,००० रुपये करण्याची, डबल ड्यूटीसाठी दुप्पट मानधन, कॅशलेस इएसआय सुविधा, अपघाताच्या वेळी अधिकाऱ्यांची उपस्थिती, मोफत बस प्रवास अशा प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
सकाळच्या सत्रात बस सेवा ठप्प राहिल्याने पीएमपीला सुमारे नऊ लाखांचे नुकसान झाले. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पीएमपीने कायम सेवेतील चालकांना ई-बस चालविण्यासाठी नेमले, मात्र तरीही अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. दुपारी ठेकेदार, पीएमपी अधिकारी आणि चालक संघटनेमध्ये चर्चा होऊन दोन दिवसांच्या आत मागण्यांवर निर्णय घेण्याचे मान्य झाल्यानंतर संप मागे घेण्यात आला. दुपारनंतर पुन्हा १८९ बसेस रस्त्यावर धावू लागल्या.












