- प्रभाग रचना अंतिम होताच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम लागणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेची प्रभाग रचना अंतिम करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. ऑक्टोबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यात ही रचना जाहीर होणार असून त्यानंतर प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढली जाईल. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वी ही महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकार्यांनी दिली.
महापालिकेत एकूण १२८ जागा असून त्यापैकी निम्म्या म्हणजे ६४ जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जातीसाठी २० जागा, अनुसूचित जमातीसाठी ३ तर इतर मागासवर्गीयांसाठी ३५ जागा राखीव असतील. याशिवाय सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी ३५ जागा ठेवण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे १२८ पैकी एकूण ९३ जागा विविध प्रवर्गांसाठी आरक्षित राहणार असून उर्वरित ३५ जागा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी असतील.
राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने प्रभाग रचना व आरक्षणाबाबतचे वेळापत्रक यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यानुसार महापालिकेची समिती काम करीत असून, अंतिम रचना प्रसिद्ध झाल्यानंतर आरक्षण सोडतीची प्रक्रिया हाती घेण्यात येईल. ही सोडत नगरविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली काढली जाईल, असे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.
आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीचे वेळापत्रक निश्चित केले जाणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या हालचालींना आता गती मिळणार आहे.












