- स्वच्छ भारत अभियानाच्या प्रशासकीय कार्यक्रमाला राजकीय बहार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. २३ ऑगस्ट २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्वच्छ भारत अभियानांतर्गत आयोजित स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ हा कार्यक्रम आज वेगळ्याच कारणांनी चांगलाच गाजला. शनिवारी (दि. २३) रोजी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित या कार्यक्रमात कौतुकाच्या शब्दांमध्ये राजकीय मिश्कीलता मिसळल्याने उपस्थितांमध्ये क्षणभर हशा पिकला.
मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना ‘हट्टी स्वभावाचे’ संबोधत चिमटा काढला. त्यांनी सुरुवातीला आयुक्तांवर टीका केली असली तरी लगेचच “कामाच्या बाबतीत ते काटेकोर आहेत, मोठे प्रकल्प त्यांच्या काळात मार्गी लागले आहेत,” असे म्हणत सारवासारव केली.
या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही मिश्कील टिपण्णी करण्याची संधी सोडली नाही. “आयुक्त कसे आहेत हे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना विचारा,” असे पवार हसत म्हणताच सभागृहात एकच खसखस पिकली. कारण, काही दिवसांपूर्वी बनसोडे यांना आयुक्तांना कशी वागणुक दिली? हे सर्वश्रुत आहेच. त्याच पार्श्वभूमीचा संदर्भ घेत अजित पवारांनी खा. बारणे यांच्या विधानावर कोटी केली.
यावेळी अजित पवार पुढे म्हणाले, “आमदार शंकर जगताप, महेश लांडगे आणि अमित गोरखे यांची यावर मतं वेगळी असू शकतात.”
त्यांच्या या टिप्पणीने उपस्थित नेत्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले. एका बाजूला आयुक्तांच्या कारभाराविरोधात आंदोलन होत असताना दुसरीकडे त्यांचे कौतुक व टीका अशा दोन टोकांच्या प्रतिक्रिया येत असल्याचे या कार्यक्रमातून दिसुन आले.
शेखर सिंह यांच्याविषयी खासदार बारणे यांनी व्यक्त केलेल्या मताला राजकीय रंग चढला असला तरी, त्यांनी आयुक्तांच्या कामकाजाचे कौतुकही केले. परिणामी, या कार्यक्रमात कौतुक, टोमणे आणि मिश्कील कोटी यांचा संगम पाहायला मिळाला. महापालिकेच्या कारभारावरील मतभेद आणि राजकीय समीकरणे यातून पुन्हा एकदा उघडकीस आली आहेत.












