- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मतदारांना सल्ला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (२३ ऑगस्ट २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहराने स्वच्छ भारत अभियानातील स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये देशात सातवे तर राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. तसेच शहराला ७ स्टार कचरामुक्त आणि वॉटर-प्लस प्रमाणपत्रही मिळाले असून, केंद्र सरकारकडून महापालिकेला पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या यशात योगदान देणाऱ्यांचा सन्मान व आगामी स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ च्या पूर्वतयारीचा प्रारंभ आज चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला.
कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, “बारामतीत आता अनधिकृत फलकबाजी करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होतात. बोर्ड लावणारा आणि ज्याचा बोर्ड लावलाय त्याच्यावर कारवाई केली जाते. अशी मोहीम पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही सुरू करावी. शहर स्वच्छ ठेवण्याच्या प्रयत्नांना हे अनधिकृत बोर्ड बकालपणा आणतात. त्यामुळे ज्याचे बोर्ड जास्त लावले जातात त्याला नागरिकांनी मतदानच करू नये. कारण काम बोलते, बोर्डांची गरज नसते.”
यावेळी त्यांनी विनोदी शैलीत सांगितले की, “माझा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो, आणि त्यावेळी जिकडे-तिकडे अनधिकृत बोर्ड लागतात. पण परवानगीशिवाय असे फलक लावू नका.”
या कार्यक्रमाला विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासह अनेक मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. स्वच्छतेच्या या यशात सर्वसामान्य नागरिकांचाही मोठा वाटा असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.












