न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०१९) :- शहरातील प्रत्येक घरातून महापालिका दररोज ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करणार आहे. त्या बदल्यात पालिका प्रत्येक घरासाठी उपभोक्ता शुल्क आकारणार आहे.
प्रत्येक सदनिका व घरातून दरमहा ६० रुपये, विक्रेते व व्यावसायिकांकडून १८० रुपये आणि झोपडपट्टी भागातील घरातून दरमहा ३० रुपये उपभोक्ता शुल्क वसूल केले जाणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.
पालिकेच्या वतीने घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपो येथे वाहन नेला जाणार आहे. हे काम दोन ठेकेदार शनिवार (दि. १ जून) पासून सुरू करणार आहेत. प्रत्येक घरातून ओला व सुका असा वेगवेगळा कचरा गोळा केला जाणार आहे. त्यामुळे पालिकेकडून उपभोक्ता शुल्क लागू करण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत.

















