न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे, (दि. ८ सप्टेंबर २०२५) : हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाच्या मेट्रो लाईन ३ प्रकल्पाचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याची नवी मुदत निश्चित करण्यात आली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) या प्रकल्पाची अंमलबजावणी टाटा व सिमेन्स समूहाच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) पद्धतीने करीत आहे.
या मार्गावर मेट्रोची चाचणी सुरू आहे. जुलैमध्ये पहिली चाचणी झाली होती, तर नुकतीच चौथी चाचणी हिंजवडीच्या बाहेर बालेवाडीपर्यंत करण्यात आली. सुमारे १२ किमी अंतराची ही चाचणी यशस्वी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर २०२५ पर्यंत मेट्रो सेवा सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अजूनही काही स्थानकांचे काम अपूर्ण असून, जिन्यांसह अन्य सोयींची उभारणी अंतिम टप्प्यात आहे. काही स्थानकांचे ९० तर काहींचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण होण्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
“सर्व उर्वरित कामे मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” अशी माहिती पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता रीनाज पठाण यांनी दिली.












