न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, ८ सप्टेंबर २०२५ :- चिंचवड येथील एलप्रो मॉलमधील आयनॉक्स चित्रपटगृहात चित्रपट पाहताना झालेल्या वादातून एका तरुणास व त्याच्या पत्नीला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अभिषेक प्रफुल्ल देशपांडे (वय २९, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांच्यासह त्यांची पत्नी व बहिण ५ सप्टेंबर रोजी रात्री ‘कॉन्यु रिंग’ हा चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या मागील सीटवर बसलेल्या अकिब जावेद निसार पटेल (रा. वल्लभनगर, पिंपरी) याला शांत राहण्यास फिर्यादीने सांगितल्यामुळे वाद झाला.
मध्यांतरानंतर आरोपी अकिब पटेलने फिर्यादीशी उग्र वर्तन केले. त्याने कॉलर पकडून फिर्यादीला खाली पाडले व हात-पायाने मारहाण करून जखमी केले. यावेळी फिर्यादीची पत्नी यांनी मध्ये पडताच आरोपी व त्याच्या पत्नीनं तिच्याशीही ढकलाढकली व मारहाण केली. दोघांनीही शिवीगाळ केल्याचे फिर्यादीने पोलिसांत सांगितले आहे.
या घटनेबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास पोउपनि मोहिते करीत आहेत.












