न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. ८ सप्टेंबर २०२५) :- भोसरीतील सदगुरुनगर परिसरात भरधाव टेम्पोने दोन महिलांना जोरदार धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर आरोपी चालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
ही घटना ६ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास सदगुरुनगर कमानीजवळ घडली. फिर्यादी काशिनाथ गादेकर यांची मुलगी कादंबरी गादेकर (वय १७) व त्यांचे मेव्हण्याची पत्नी प्रतिभा आंबटवार (वय ३२, रा. सदगुरुनगर) या दोघी रस्त्याने जात असताना साऊंड सिस्टीम टेम्पोने त्यांना धडक दिली. अपघातात दोघींना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.
चालक हणुमंत सोपान वाडेकर (वय ३६, रा. शिरोली, ता. खेड, पुणे) हा अपघातानंतर न थांबता पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना स्थानिक नागरिकांनी त्याला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले.
या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम तसेच मोटार वाहन कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोउपनि गुरव करीत आहेत.












