- आकुर्डी-भोसरीतील गणेश मंडळांच्या अध्यक्षांसह इतरांवर गुन्हे दाखल..
- पोलीसांची ध्वनीप्रदूषणाविरुद्ध कडक कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. ८ सप्टेंबर २०२५) :- गणेश विसर्जन मिरवणुकांदरम्यान ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) अधिनियम तसेच पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आकुर्डी व भोसरी परिसरात विविध मंडळांविरुद्ध सहा गुन्हे दाखल केले आहेत.
निगडी पोलीस ठाण्यात दोन प्रकरणांत शिवाजी मित्र मंडळ (आकुर्डी) आणि सुदर्शन मित्र मंडळ (सुदर्शननगर) यांच्या पदाधिकाऱ्यांसह बीम लाईट, लेझर आणि डॉल्बी वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. मंडळांचे अध्यक्ष सुरज पिंजण व आदित्य शिंदे यांच्यासह उपकरण मालक व चालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
दरम्यान, भोसरी पोलीस ठाण्यात तीन प्रकरणे नोंदविण्यात आली. प्रथमेश गवळी (भोसरी), आर्यन सपकाळ (लोंढे आळी), स्वप्नील बुर्डे (शास्त्री चौक) या मंडळाध्यक्षांवर तसेच संबंधित ट्रॅक्टर मालक व ध्वनीयंत्र मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनाई असूनही मोठ्या क्षमतेचे डॉल्बी साऊंड, बीम लाईट व लेझरचा वापर सार्वजनिक ठिकाणी करून नागरिकांना ध्वनीप्रदूषणाला तोंड द्यावे लागले. या कारवाया भारतीय न्याय संहिता कलमे, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, ध्वनीप्रदूषण नियम २००० व महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार करण्यात आल्या आहेत.
सर्व आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. पुढील तपास संबंधित पोलीस अधिकारी करत आहेत.












