- पिंपरी-चिंचवड शहरातील जुन्या विकास आराखड्यास मिळणार गती..
- आराखड्यातील रस्ते आणि इतर विकासकामांसाठी महापालिकेची नोटीस..
- मोबदला स्वरूपात जमीनमालकांना मिळणार टीडीआर, एफएसआयचा लाभ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 24 सप्टेंबर 2025) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगररचना व विकास विभागाकडून शहरातील विविध भागांतील एकूण 4248 चौ.मी. इतकी जमीन ताब्यात घेण्यासाठी वृतपत्रात महत्त्वाची जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जमिनी विकास आराखड्यातील रस्ते व सुविधा भूखंडासाठी बाधित झालेल्या असून, मोबदला स्वरूपात संबंधित जमीनमालकांना हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) किंवा उर्वरित भूखंडावर एफएसआयचा लाभ दिला जाणार आहे.
महापालिकेच्या या कार्यवाहीत वाकड, रावेत, बो-हाडेवाडी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, चर्होली बु. आणि पुनावळे या भागांतील जमिनींचा समावेश आहे. यात वाकड परिसरातील 1226.25 चौ.मी., 398.75 चौ.मी. आणि 81 चौ.मी., रावेतमधील 125 चौ.मी., बो-हाडेवाडीत 94.50 चौ.मी. व 182.25 चौ.मी., पिंपळे गुरवमध्ये 47.40 चौ.मी., च-होली बु. येथे 562.50 चौ.मी., पुनावळेमध्ये 1436.65 चौ.मी. आणि पिंपळे निलखमध्ये 94.15 चौ.मी. इतक्या जागांचा समावेश आहे.
नोटीसनुसार, संबंधित जमिनीवर नमूद मालकांशिवाय अन्य कोणाचाही हक्क, गहाण, दान, खरेदी, पोटगी, लीज किंवा इतर हितसंबंध असल्यास, अशा व्यक्तींनी नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांच्या आत नगररचना विभागात मूळ कागदपत्रांसह लेखी हरकत दाखल करावी. मुदतीत हरकत दाखल न झाल्यास, महापालिका जमीन ताब्यात घेईल व त्याचा मोबदला जमीनमालकांना टीडीआर किंवा एफएसआयच्या स्वरूपात दिला जाईल. त्यानंतर येणाऱ्या कोणत्याही तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
ही नोटीस नगररचना व विकास विभागाचे उपसंचालक किशोर गोखले यांच्या सहीने प्रसिद्ध करण्यात आली असून, शहरातील रस्ते रुंदीकरण व सुविधा विकास प्रकल्पांना गती मिळणार आहे.
मंजुर विकास आराखड्यानुसार भूसंपादनाच्या जाहीर नोटीस दिलेल्या आहेत. मुदतीच्या कालावधीत हरकती आल्यास त्या निराकरण केल्या जातील. विविध आरक्षणे विकसित केले जातील.
– प्रशांत शिंपी, सहायक संचालक – नगररचना विभाग मनपा…












