- पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची मोठी कारवाई..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २५ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर रोज १० ते २० टक्के नफा मिळेल या आमिषाने तब्बल १५० ते १६० नागरिकांची अंदाजे २० ते २५ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. या प्रकरणी आठ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फिर्यादी हे फार्मा कंपनीत प्रोग्रामर म्हणून कार्यरत असून त्यांना फेसबुकवर दिसलेल्या जाहिरातीतील लिंकवरून “E11 Kotak helps you achieve your dreams” या WhatsApp ग्रुपमध्ये सामील करण्यात आले. या ग्रुपचे अॅडमिन श्रीपाल शाह (मो. नं. +918438277107, +919060050386) व Aarati Bhalla (मो. नं. +917737470397) यांनी त्यांना KOTAK QIB या बनावट अॅपवर ८९ लाख ३५ हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. त्यावर ८ कोटी ७१ लाख रुपयांचा नफा दाखवून परताव्यासाठी सर्व्हिस टॅक्सच्या नावाखाली रक्कम अडकवण्यात आली.
तपासादरम्यान कॉसमॉस बँक खाते क्रमांक ८८१००१०६७६७ (IFSC- COSB0000088) मध्ये ३३ लाख ८६ हजार रुपये ट्रान्सफर झाल्याचे उघड झाले. हे खाते यश भारत पाटोळे (वय २५, रा. कोल्हापूर, सध्या कोंढवा, पुणे) याच्या नावावर असून त्याच्या अटकेनंतर संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाला.
या कारवाईत १) यासीर अब्दुल माजिद शेख (वय ३४, उंड्री, पुणे), २) मोहम्मद सुलतान अहमद मोहम्मद जेहरेहुन (वय ३०, पटणा, बिहार), ३) माझ अफसर मिर्झा (वय २४, स्वारगेट, पुणे), ४) हुसेन ताहीर सोहेल शेख (वय २३, संभाजीनगर), ५) बाबुराव शिवकिरण मेरु (वय ४१, हडपसर, पुणे), ६) यश भारत पाटोळे (वय २५, कोल्हापूर), ७) अजित आनंदराव गायकवाड (रा. सांगली), ८) धनाजी नाथा पाटील (रा. सांगली) यांच्याकडून ९ मोबाईल, १५ सिमकार्ड, ४ सीसीटीव्ही कॅमेरे, ८ चेकबुक, २० एटीएम/डेबिट कार्ड, १ लॅपटॉप, १ पासपोर्ट व १३,५५० रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे, पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे यांच्या पथकाने केली. सरकारी अभियोक्ता गिरीष बारगजे यांनी न्यायालयीन कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावली.
सायबर पोलिसांच्या या कारवाईमुळे फसवणूक करणाऱ्या टोळीचे आंतरराज्यीय जाळे उघड झाले आहे.












