न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ सप्टेंबर २०२५) :- सायबर गुन्हेगाराने स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे भासवत पिंपरीतील एका ज्येष्ठ वकीलाची तब्बल १ कोटी ८० लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
घटना दि. ४ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२५ दरम्यान घडली. आरोपींनी फिर्यादी यांना फोन करून स्वतः सीबीआय अधिकारी असल्याचे भासवले. त्यांनी बनावट आधारकार्ड वापरून मनी लॉन्ड्रिंगमध्ये तुमचे नाव आल्याचे सांगत, तुमच्यावर व तुमच्या पत्नीवर कारवाई करून अटक करू अशी धमकी दिली. तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट पीडीएफ पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला.
या दबावाखाली फिर्यादींकडून विविध बँक खात्यांमध्ये एकूण ₹1,80,37,000 रुपये भरायला भाग पाडण्यात आले. आरोपींनी ही रक्कम “व्हेरिफिकेशननंतर परत करू” असा खोटा विश्वास दाखवला.
या गंभीर गुन्ह्यात आरोपी अद्याप फरार असून, त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम व माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.












