- नागरिकांच्या समस्या जाणून घेत तातडीने उपाययोजना करण्याच्या सुचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. २६ सप्टेंबर २०२५) :- मावळ तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या, अपेक्षा व गरजा प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या उद्देशाने आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या जनसंवाद अभियानाला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.
या अभियानांतर्गत आमदार शेळके यांनी कामशेत शहर, कुसगाव खुर्द आणि चिखलसे गावांना भेट देऊन नागरिकांशी थेट संवाद साधला. कामशेत येथील गणेश मंगल कार्यालय, बाजारपेठ तसेच कुसगाव खु. आणि चिखलसे गावातील श्री भैरवनाथ मंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी आपापल्या अडचणी मांडल्या.
वाढत्या नागरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या—पिण्याच्या पाण्याची टंचाई, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, गटार व्यवस्था आणि कचरा व्यवस्थापन या प्रमुख प्रश्नांवर नागरिकांनी मागण्या केल्या. त्यावर आमदार शेळके यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच इंद्रायणी कॉलनी, दौंडे कॉलनी, सहारा कॉलनी, पंचशील कॉलनी, देवराम कॉलनी आणि दत्त कॉलनी या भागातील वाढत्या लोकसंख्येला आवश्यक मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
या अभियानात महसूल विभाग, पंचायत समिती, विद्युत विभाग, PMRDA, बांधकाम विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, MSRDC, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. समस्यांवर जागेवरच कार्यवाही करण्याचे आदेश आमदार शेळके यांनी दिल्याने नागरिकांत समाधान व्यक्त झाले.
नागरिकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आमदार शेळके म्हणाले –
“जनतेच्या विश्वासामुळेच विकासकामांना गती मिळते. या जनसंवाद अभियानातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हीच गावाच्या प्रगतीची खरी प्रेरणा आहे. नागरिकांच्या हितासाठी व विकासासाठी हे अभियान सातत्याने राबविले जाईल.”












