- उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची विधानभवनात आयोजित बैठकीत सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
बोपखेल (दि. २६ सप्टेंबर २०२५) :- बोपखेल येथून सी एम ई आर्मी परिसरातून जाणारा हक्काचा रस्ता खुला करण्यासाठी झालेल्या आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, अशा सूचना विधानसभा उपाध्यक्ष तथा पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांना दिल्या.
या आंदोलनात अनेक महिला आणि युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे महिलांना रोजगारासाठी आवश्यक असलेल्या पोलिस पडताळणीमध्ये अडचणी निर्माण होत असून बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. याबाबत तोडगा काढण्यासाठी विधानभवन येथे गावकरी व पोलिस प्रशासनाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीस बोपखेल येथील ग्रामस्थ उपस्थित होते. तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त, उपायुक्त आणि संबंधित पोलीस अधिकारी सहभागी झाले होते.
उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले,“हा विषय अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. आंदोलनादरम्यान महिलांसह, मुलांवर आणि नागरिकांवर नोंदवलेले गुन्हे मागे घेण्यासाठीचा प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठवावा. प्रस्ताव आल्यानंतर शासन स्तरावर गुन्हे मागे घेण्याचा निर्णय होईल. यामुळे नागरिकांना अनेक वर्षांचा त्रासातून दिलासा मिळेल.”
गेली अनेक वर्षे या प्रश्नाचा पाठपुरावा शशिकांत घुले करत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतीक्षा घुले, महेश झपके, दशरथ घुले, उल्हास घुले, प्रवीण शिंदे, विकास उजगरे, राजेश कदम, कर्णराज धोदाडे, मदन बबन घुले, संजय रामदास बेरड, जियाउद्दीन हुसेन बादशाह नागुर, स्वयम जनार्दन सस्ते यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच दापोडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कोळी देखील यावेळी उपस्थित होते.












