- वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा – पोलिस उपायुक्त विवेक पाटील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी | गुरुवार, ९ ऑक्टोबर २०२५ :- ट्रॅफिकमुक्त चाकण कृती समितीतर्फे गुरुवारी (दि. ९ ऑक्टोबर) चाकण ते आकुर्डी येथील पीएमआरडीए कार्यालयावर पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत मोर्चा मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
या संदर्भात पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी आदेश जारी केले असून, नागरिक व वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे. निगडी वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
वाहतूक बंद राहणारे मार्ग :-
निगडी-प्राधिकरणातील काचघर चौक – भेळ चौक – संभाजी चौक – बिजलीनगर पूल या सेवा रस्त्यावरून येण्या-जाण्यास सर्व प्रकारच्या वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहनांना मुख्य मार्गाने जाण्याची मुभा असेल. तसेच बिजलीनगर पूल ते पीएमआरडीए कार्यालय या रस्त्यावर सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहने एलआयसी कॉर्नरमार्गे आपल्या इच्छित स्थळी पोहोचू शकतील.
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आणि सुचविलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.