- पीएमआरडीएकडून ४०.७४ किमी अंतरातील रस्ते प्राधान्याने हाती..
- ४२८ अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी | गुरुवार, ९ ऑक्टोबर २०२५ :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) क्षेत्रातील खेड तालुक्यातील चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्ते विकासकामांना गती देण्यात आली आहे. एकूण ४०.७४ किलोमीटर अंतरावरील रस्त्यांसाठी ५५८.१२ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून सर्व कामे प्राधान्याने हाती घेण्यात आली आहेत.
या अंतर्गत चाकण परिसरातील प्रमुख रस्त्यांची सुधारणा, विस्तार आणि जोडरस्त्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. या कामांमध्ये धामणे फाटा–कोये (२.०० किमी, ₹८.०० कोटी), कोहिंडे फाटा–कडूस गावठाण (५.६० किमी, ₹२०.०० कोटी), कडूस गावठाण–किवळे (५.५० किमी, ₹२०.०० कोटी), भोसे–वडगाव घेनंद (१.२० किमी, ₹५.०० कोटी), किवळे–आंबेठाण (०.८९ किमी, ₹३.५० कोटी), देहू–येलवाडी (२.५ किमी, ₹१०४.०० कोटी), चिखली–मोई (१.७० किमी, ₹१३.४२ कोटी), कुरुळी फाटा–निघोजे (२.५० किमी, ₹१५.५० कोटी), पुणे-नाशिक रस्ता (आळंदी फाटा)–आळंदी रस्ता (४.०० किमी, ₹२०.०० कोटी), चऱ्होली खुर्द–आळंदी (२.०० किमी, ₹१२.०० कोटी), निघोजे–चाकण MIDC (१.५० किमी, ₹६.७२ कोटी), खालुब्रे–MIDC फेज २ (२.०० किमी, ₹१२.५० कोटी), तळेगाव–चाकण महामार्ग (०.९० किमी, ₹२४.६५ कोटी), नाणेकरवाडी–समृद्धी सीएनजी पंप (१.२ किमी, ₹३३.४० कोटी), मेदानकरवाडी–रासे फाटा (२.५ किमी, ₹१११.७५ कोटी) आणि वेस्टर्न बायपास जोडरस्ता (०.७५० किमी, ₹९१.६८ कोटी) या प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे.
या सर्व प्रकल्पांची एकत्रित लांबी ४०.७४ किलोमीटर आणि एकूण किंमत ₹५५८.१२ कोटी इतकी आहे. या कामांची निविदा प्रक्रिया, तांत्रिक छाननी आणि भूसंपादनाची कार्यवाही सुरू असून पीएमआरडीएमार्फत ती प्राधान्याने पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
दरम्यान, चाकण परिसरातील अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेत ३४७ अनधिकृत बांधकामे व ८१ अवैध होल्डिंग्ज अशा एकूण ४२८ बांधकामांवर निष्कासन कारवाई करण्यात आली आहे.
या सर्व उपाययोजनांमुळे चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी कमी होऊन उद्योग, वाहतूक आणि नागरी विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास पीएमआरडीए प्रशासनाने व्यक्त केला आहे.