- राजकीय सुडापोटी प्रभागरचनेत बदल केल्याचा आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, ९ ऑक्टोबर २०२५ :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अंतिम प्रभागरचनेविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे माजी शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. राजकीय सुडबुद्धीने आणि विशिष्ट पक्षांना लाभ व्हावा या उद्देशाने प्रभाग क्रमांक २४ मध्ये जाणीवपूर्वक बदल करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
अॅड. भोसले यांनी सांगितले की, पूर्वीच्या आराखड्यानुसार प्रभाग क्रमांक २४ (डांगे चौक, गणेशनगर, थेरगाव) मध्ये वाकडमधील म्हातोबा झोपडपट्टीचा समावेश होता. या प्रभागात अनुसूचित जातीसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले होते. मात्र, त्या आरक्षणाचा प्रभाव कमी करण्यासाठी म्हातोबा झोपडपट्टीचा भाग प्रभाग क्रमांक २५ मध्ये हलविण्यात आला. हा बदल राजकीय स्वार्थ साधण्यासाठी व सूडापोटी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
महानगरपालिकेच्या प्रभागरचनेच्या प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून, राजकीय दबावाखाली विशिष्ट पक्षांना अनुकूल असे फेरबदल करण्यात आले आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. या कृतीमुळे अनुसूचित जातींच्या आरक्षणाचा मूळ हेतू डावलला गेला असून त्या समाजाच्या प्रतिनिधित्वावर परिणाम झाला आहे, असे भोसले यांनी स्पष्ट केले.
याच पार्श्वभूमीवर त्यांनी अन्यायकारक प्रभागरचनेविरोधात हायकोर्टात रिट पिटिशन दाखल केली आहे. या याचिकेत प्रभाग क्रमांक २४ मधील आकडेवारीचा तपशील सादर करून अनुसूचित जातींच्या आरक्षणाचा हेतू अबाधित ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
अॅड. भोसले म्हणाले, “प्रभाग क्रमांक २४ हा अगोदरच अनुसूचित जातीसाठी राखीव असताना देखील त्या प्रभागातील अनुसूचित जातींच्या मतदारसंख्येत फेरबदल करण्यात आला. अधिकार नसताना देखील राजकीय दबावाखाली हा बदल घडवून आणण्यात आला आहे. मी न्याय आणि संविधानावर विश्वास ठेवतो. न्याय मिळेल याची खात्री आहे. २०१७ मध्ये जनतेने माझ्यावर विश्वास दाखवून मला निवडून दिले होते. यावेळीही जनता माझ्यावर विश्वास ठेवेल आणि माझ्या पाठीशी उभी राहील.”