- युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव यांचा पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड | गुरुवार, ९ ऑक्टोबर २०२५ :- गेल्या महिन्याभरात मराठवाडा भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. उभ्या पिकांवर पावसाने झोडप घातल्याने बळीराजाची शेती अक्षरशः खरवडून निघाली. या संकटात पिंपरी चिंचवड भाजप युवा मोर्चा नागरिक आणि शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभा राहत “एक हात मदतीचा” ही सामाजिक उपक्रम राबवत आहे.
पिंपरी चिंचवड भाजपा नेते तथा भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, पिंपरी चिंचवड भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष दिनेश लालचंद यादव यांनी सामाजिक बांधिलकी जपत पुरग्रस्तांसाठी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत ५०० मदत किट तयार करण्यात आले असून पूरग्रस्त भागात ती पाठविण्यात येणार आहेत.
या मदत किटमध्ये अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू, स्वच्छतेसाठी साहित्य तसेच आवश्यक वैद्यकीय सामग्रीचा समावेश आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांना तातडीची मदत मिळावी, यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आल्याचे दिनेश यादव यांनी सांगितले.
“संकटाच्या काळात एकमेकांना मदतीचा हात देणं ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. आम्ही फक्त एक छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे,” असे भावनिक उद्गार यादव यांनी यावेळी व्यक्त केले.