- नवनियुक्त आयुक्त श्रावण हर्डीकरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी | गुरुवार, ९ ऑक्टोबर २०२५ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते उद्या, शुक्रवारी सकाळी १० वाजता नगरीचे शिल्पकार आणि माजी नगराध्यक्ष दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून होणार आहे.
या महोत्सवाला केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचाही कार्यक्रमास प्रमुख सहभाग असणार आहे.
याशिवाय खासदार मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, श्रीरंग आप्पा बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार अमित गोरखे, उमा खापरे, महेश लांडगे, शंकर जगताप, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे, तसेच माजी खासदार, माजी आमदार, माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विविध विभागप्रमुख आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
वर्धापन दिन कार्यक्रमाची सुरुवात अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात येईल. त्यानंतर रक्तदान शिबिर, रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम ‘खेळ पैठणीचा’ आयोजित करण्यात आला आहे.
दुपारी २ वाजता प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड येथे महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी गीतगायनाचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तसेच सायंकाळी ५ वाजता उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आणि विविध स्पर्धांतील विजेत्यांचा सत्कार समारंभ होणार असून, या सोहळ्याने वर्धापन दिन साजरा होणार आहे.