- विरोध करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे फर्मान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी | गुरुवार, ९ ऑक्टोबर २०२५ :- पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी पाणी मीटर बसविण्याची मोहीम हाती घेतली आहे.
या मोहिमेत कोणत्याही व्यक्तीने किंवा समूहाने विरोध केल्यास त्यांच्यावर नियमानुसार गुन्हा दाखल करण्याचे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिले आहेत. तसेच अनधिकृत नळजोडणी खंडित करण्याच्या कारवाईला गती देण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
शहराची वाढती लोकसंख्या आणि मर्यादित पाणीसाठा लक्षात घेता अचूक पाणीपुरवठा नियोजन अत्यावश्यक बनले आहे. त्यामुळे पाणी गळती रोखणे, अनधिकृत वापर थांबवणे आणि पाणीपुरवठ्याचा हिशोब ठेवणे यासाठी महापालिकेने सर्व प्रकारच्या नळजोडण्यांवर पाणी मीटर बसविणे अनिवार्य केले आहे. ही मोहीम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत राबवली जात असून, यामुळे प्रत्येक पाणीपट्टीधारकाची अचूक माहिती उपलब्ध होईल आणि अनधिकृत नळजोडणींचा अंत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
सध्या शहरात सुमारे १० हजारांहून अधिक अनधिकृत नळजोडण्या असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिकेने ही मोहीम व्यापक पातळीवर सुरू केली आहे. घरगुती वापरासाठी मीटर आणि नळजोडणीचा खर्च पाणीपट्टीधारकांकडून हप्त्याने पाणीबिलातून वसूल केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी तात्काळ पाणी मीटर बसवून घ्यावेत, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
याशिवाय, व्यावसायिक वापरावरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, हॉटेल्स, वॉशिंग सेंटर्स, बांधकामे, आर.ओ. प्लांट्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिकांनी पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत वापर तात्काळ थांबवावा, तसेच अनधिकृत नळजोडणी नियमित करून मीटर बसवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
“पिंपरी चिंचवड शहराला पुरवल्या जाणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब मोजला जाणे आवश्यक आहे. पाणी मीटरमुळे पाणी वापराची अचूक आकडेवारी मिळेल, ज्यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन आणि अपव्यय टाळणे शक्य होईल. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करून पाणी मीटर बसवून घ्यावे,”
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका….