- पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी “X” द्वारे थेट साधला नागरिकांशी संवाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, बुधवार, १५ ऑक्टोबर २०२५ : राज्य सरकारतर्फे सुरू असलेल्या “सायबर सुरक्षा जनजागृती मोहिमे”च्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली “व्हर्च्युअल टाऊन हॉल” हा अभिनव संवाद उपक्रम “X” या माध्यमाद्वारे पार पडला.
या कार्यक्रमात पोलीस आयुक्तांनी थेट ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांशी आणि नागरिकांशी संवाद साधून सायबर गुन्हे प्रतिबंध आणि डिजिटल सुरक्षा उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी नागरिकांना PCcity Police आणि @CP-PccityPolice या अधिकृत हँडल्सवर आपले प्रश्न, सूचना आणि तक्रारी मांडण्याचे आवाहन केले.
या उपक्रमात पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील ८१ शाळा, महाविद्यालये आणि औद्योगिक समूहांतील १२ हजारांहून अधिक विद्यार्थी व नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला, तर सुमारे ३३,८४४ नागरिकांनी ऑनलाईन माध्यमातून हजेरी लावली. अशा प्रकारे ४५ हजारांहून अधिक नागरिकांनी या उपक्रमात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहभाग नोंदवला.
संपूर्ण संवादादरम्यान नागरिकांनी विविध प्रकारच्या सायबर फसवणुकींबाबत प्रश्न विचारले. जसे की – ऑनलाइन पेमेंट फ्रॉड, ओटीपी स्कॅम, सोशल मीडियावरून होणारे आर्थिक गुन्हे, तसेच वैयक्तिक माहिती चोरी होण्याच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात यासंबंधी प्रश्न उपस्थित झाले. पोलीस आयुक्त श्री. चौबे यांनी प्रत्येक प्रश्नाचे समर्पक आणि सविस्तर उत्तर देत सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठीचे महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले.
“सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहणे आणि डिजिटल व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे. पोलिसांशी थेट संवाद साधून जागरूकतेत वाढ करणे ही काळाची गरज आहे,” असे मत आयुक्त चौबे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) विशाल हिरे यांनी नियोजन केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे मार्गदर्शन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर आणि अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी केले.
कार्यक्रमात सर्व पोलीस उपआयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते. नागरिकांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, या जनजागृती मोहिमेमुळे भविष्यात सायबर गुन्हे कमी होण्यासाठी निश्चितच हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.












