न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे गुरव, दि. १५ ऑक्टोबर २०२५ :- सांगवी पोलीस ठाण्यात इंगवले पाटील कन्स्ट्रक्शन कंपनी विरुद्ध तब्बल ₹८६,४४,२१९/- रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात प्रचित बाळासाहेब इंगवले (रा. पिंपळे गुरव, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी संदेश निवृती थिटे (वय ५०, व्यवसाय – विद्युत ठेकेदार, औंध) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १३ नोव्हेंबर २०२१ रोजी इंगवले पाटील कन्स्ट्रक्शन कंपनी तर्फे प्रभाग क्र. ७ भोसरी येथील बापुजी बुवा चौक ते पीएमटी चौक या रस्त्यावरील विद्युत कामासाठी वर्क ऑर्डर देण्यात आली होती.
थिटे यांनी निर्धारित मुदतीत काम पूर्ण करून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून पूर्णत्व प्रमाणपत्र प्राप्त केले. त्यानंतर नगरपालिकेने कंपनीच्या खात्यात ₹१,९९,९३,१४५/- इतकी रक्कम जमा केली. मात्र, कंपनीने फिर्यादीस फक्त ₹६३,१२,४२३/- इतकीच रक्कम अदा करून उर्वरित ₹८६,४४,२१९/- रुपयांची देयक बाकी ठेवली.
फिर्यादी यांनी उर्वरित रकमेबाबत चौकशी केल्यावर आरोपी प्रचित इंगवले यांनी “तु जीएसटी वेळेवर भरली नाही, तुला काय करायचं ते कर” अशी धमकी देत रक्कम देण्यास नकार दिला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल नांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.












