- यंदा आयटी कर्मचारी, औद्योगिक कामगार, समाविष्ट भागांतील मतदारांचा पगडी भारी…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०२५):- पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक केवळ सत्तांतरापुरती मर्यादित न राहता शहराच्या पुढील राजकीय आणि प्रशासकीय दिशेला आकार देणारी ठरणार आहे. गेल्या काही वर्षांत राज्याच्या राजकारणात झालेल्या मोठ्या उलथापालथींचे प्रतिबिंब यावेळी थेट महापालिका निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.
२०१७ मध्ये भाजपने स्वबळावर सत्ता मिळवत शहराच्या राजकारणात वर्चस्व निर्माण केले होते. मात्र, त्यानंतरच्या काळात पक्षफुटी, नव्या आघाड्या आणि सत्तासमीकरणांतील बदल यामुळे यावेळी चित्र पूर्णपणे वेगळे आहे. महायुतीतील घटक पक्ष, राष्ट्रवादीचे दोन गट आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत रंगण्याची चिन्हे आहेत.
यावेळी मतदारांचा कौल कोणत्या बाजूने झुकतो, यामध्ये नवमतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आयटी क्षेत्रातील कर्मचारी, औद्योगिक कामगार, तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या भागांतील मतदार हे निर्णायक घटक ठरण्याची शक्यता आहे. प्रशासक राजवटीमुळे गेल्या तीन वर्षांत लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमधील थेट संवाद कमी झाला असून, त्याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो.
या निवडणुकीत पक्षीय घोषणांपेक्षा नागरी प्रश्न अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची दुरवस्था, वाढता करभार, प्रदूषण, घरकुलधारकांचे प्रश्न आणि अनधिकृत बांधकामे हे मुद्दे केंद्रस्थानी राहणार आहेत. महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील मूलभूत सुविधा हा देखील महत्त्वाचा विषय ठरणार आहे.
भाजपकडे संघटनात्मक ताकद आणि माजी नगरसेवकांचा अनुभव आहे, तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा पारंपरिक मतदारांवर प्रभाव आहे. शिंदेसेना औद्योगिक भागांतील मराठी आणि कामगार वर्गावर लक्ष केंद्रीत करत आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडी स्थानिक नेतृत्व, सामाजिक समीकरणे आणि मतदार एकत्र आणण्याच्या प्रयत्नात आहे.
एकूणच, यंदाची महापालिका निवडणूक बहुकोनी, मुद्देसूद आणि अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता असून, तिचा निकाल शहराच्या राजकारणाला नवे वळण देणारा ठरेल, यात शंका नाही.












