- वादग्रस्त आयुक्तांकडून स्थायी सभेत अडीचशे कोटींच्या विकासकामांना मंजुरी..
- प्रशासकीय निर्णयांवर प्रश्नचिन्ह?…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०२५):- महापालिका निवडणुकीची आचारसंहिता कधीही जाहीर होण्याची शक्यता असताना, त्याआधीच सोमवारी (दि. १५) सकाळी प्रशासकीय पातळीवर हालचालींना मोठा वेग आला होता. आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दीडशेहून अधिक विकासकामांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. या बैठकीत सुमारे २५० कोटी रुपयांच्या खर्चाची कामे स्थायी समितीच्या मान्यतेसाठी पुढे नेण्यात आल्याची माहिती आहे.
या प्रस्तावांमध्ये काही मोठ्या आणि चर्चेत असलेल्या कामांसह कोट्यवधींच्या वर्गीकरण व इतर तरतुदींचा समावेश असल्याचे समजते. आचारसंहिता लागू होण्याच्या अगदी आधी घेतलेले हे निर्णय पुढे वादग्रस्त ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माजी आयुक्त शेखर सिंह यांच्या बदलीनंतर हर्डीकर यांच्याकडे तात्पुरता पदभार असताना, इतक्या मोठ्या प्रमाणावर निर्णय घेण्यात आल्याने प्रशासकीय पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
सोमवारी महापालिका मुख्यालयात ठेकेदार, सल्लागार आणि संबंधित अधिकाऱ्यांची मोठी वर्दळ दिसून आली. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, नगरसचिव आणि शहर अभियंता यांच्या दालनात प्रस्ताव मंजुरीसाठी दिवसभर हालचाल सुरू होती.
काही कामांचे आदेश तातडीने काढण्यात आल्याचीही चर्चा असून, निवडणुकीपूर्वीच कामे मंजूर करून घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, १६ जानेवारीनंतर नवनिर्वाचित नगरसेवक महापालिकेत कार्यरत होणार असून, पुढील धोरणात्मक निर्णय त्यांच्या समित्यांमार्फत अपेक्षित आहेत. मात्र, त्याआधीच घेतलेले हे कोट्यवधींचे निर्णय शहराच्या राजकारणात आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत.












