- माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचा काळेवाडीत मतदारांशी थेट संवाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ४ जानेवारी २०२६) :- प्रभाग क्रमांक २२ (विजयनगर–काळेवाडी–आदर्शनगर) येथे महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने शनिवारी (दि. ३) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार उत्साहात पार पडला. पहाटेपासूनच कार्यकर्त्यांची धावपळ आणि समर्थकांच्या जयघोषामुळे संपूर्ण परिसर निवडणुकीच्या वातावरणात सजल्याचे चित्र दिसून आले.
या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मोनिकाताई नवनाथ नढे यांच्यासह महापालिकेचे माजी विरोधी मच्छिंद्र तापकीर यांनी मोरया कॉलनी, गणेश कॉलनी, जोगेश्वरी हॉस्पिटल परिसर, विजयनगर आदी भागांत काढलेल्या पदयात्रांद्वारे नागरिकांशी थेट संवाद साधला. घराघरात जाऊन वरिष्ठ नागरिक, महिला व तरुण मतदारांच्या अडचणी जाणून घेत विकासासंदर्भात आश्वासने देण्यात आली. ‘घड्याळ’ या पक्षाच्या निवडणूक चिन्हावर बटण दाबून बहुमत देण्याचे आवाहन कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी या वेळी केले.
तापकीर यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितले की, ”प्रभागातील रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा तसेच शैक्षणिक सोयींचा स्तर उंचावणे ही प्राधान्याची कामे असतील. विश्वास, सातत्य आणि विकास या तीन गोष्टींवर आमची वाटचाल आधारित आहे. मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांना विजयी करून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याची संधी द्यावी. ”












